। नेरळ । प्रतिनिधी ।
गुंडगे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा घनकचरा प्रकल्प हटावा म्हणून घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समिती गेल्या तीन वर्षापासून आंदोलन करत आहे. परंतु, कर्जत नगरपरिषद प्रशासन या गंभीर समस्येकडे पाहिजे तेवढे गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात असून डंपिंग ग्राउंड हटाव समितीकडून मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देण्यात आले आहे.
गुंडगे येथील शासकीय जागेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये कचर्याचे डोंगर उभे राहिले आहे. गुंडगे गाव तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. या विरोधात गुंडगे परिसरातील नागरिकांनी कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्याच बरोबर वेळोवेळी पत्र, निवेदने देण्यात आली होती. या निवेदनाला मुख्याधिकारी यांनी कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीने कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयात जावून मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. त्यांना पुन्हा एकदा गुंडगे गाव परिसर समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.