अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

खारघरमध्ये सिडकोची धडक कारवाई

| खांदा कॉलनी | प्रतिनधी |

खारघर नोडमधील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सिडको महामंडळाने मोठी निष्कासन मोहीम राबविली. या मोहिमेत सेक्टर 40 आणि सेक्टर 37 परिसरातील एकूण 18 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून ती हटविण्यात आली.

सिडकोच्या नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) विभागामार्फत 28 जुलै 2026 रोजी सेक्टर 40 येथील बागेश्री सोसायटीसमोरील तसेच नाल्यालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरत असलेले 7 स्टॉल्स, 1 सर्व्हिस सेंटर आणि 1 गॅरेज शेड निष्कासित करण्यात आले.

याच मोहिमेदरम्यान खारघर सेक्टर 37 मधील भूखंड क्र.-1 वर विनापरवानगी सुरू असलेली 1 नर्सरी, 5 गॅरेज, 2 फर्निचर दुकाने आणि 1 ढाबा अशी एकूण 9 अनधिकृत बांधकामेही हटविण्यात आली.

सिडकोच्या माहितीनुसार, संबंधित सर्व बांधकामे महामंडळाच्या प्रचलित नियमावली व धोरणांचे उल्लंघन करून तसेच कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल नोडचे नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) श्रीकांत पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, सिडकोचे सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सहभाग घेतला. भविष्यातही अनधिकृत बांधकामांविरोधातील अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा सिडको प्रशासनाने दिला आहे.

Exit mobile version