| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील करंजा गावाबाहेर असलेल्या करंजा टर्मिनलच्या गेट समोरील रस्त्यावर अनधिकृत मच्छि मार्केट भरत आहे. मागील वर्षी पहिल्या लॉकडाऊन पासून हे अनधिकृत मार्केट सूरू असून या मार्केटला सिडकोच्या अधिकार्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जाते. करंजा टर्मिनलच्या गेट समोर भरत असलेल्या या मार्केटमुळे वाहतूकीला अडथळा होत असून त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे.
सिडकोच्या अखत्यारीत हा भाग येत असून देखिल सिडकोचे अधिकारी यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. या मच्छिमार्केटमध्ये बाहेरून मच्छि आणून विकली जात असल्याने या मच्छिमार्केटचा येथिल स्थानिक मच्छिमारांना कोणताही फायदा होत नाही. उरणच्या मच्छि विक्रेत्यांनी देखिल या बाबत तक्रार करून हे मार्केट बंद करण्याची मागणी केली होती. मात्र सिडको आणि स्थानिक प्रशासनाने आपले हीतसंबध जपत या अनधिकृत मच्छिमार्केटला पाठबळ दिले. आत्ता पुन्हा एकदा हे मार्केट बंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या बाबत येथिल सिडकोच्या अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सिडकोने या मासळी मार्केटला कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र ज्या ठिकाणी हा बाजार भरतो ती जागा नेमकी मेरीटाईम मंडळाची की सिडकोची आहे हे सांगण्यास त्यानी नकार दिला.