स्थानिक नागरिकांवर कारवाईची मागणी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेल्या अनेक दिवसांपासून श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अनधिकृत हातगाड्या लागत होत्या. त्यांच्यावर नगरपरिषदेकडून कारवाई केल्यानंतर काही काळ हातगाड्या बंद होत्या. परंतु, आता पुन्हा समुद्रकिनारी कोणतीही परवानही न घेता अनधिकृरित्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या हातगाड्यांवरून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे जेवणदेखील विक्री केले जात होते. काही हातगाडी चालकांकडून येणार्या पर्यटकांना जेवण बनवून श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या सुशोभित बंधार्यावरती जेवण वाढण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर नगर परिषदेच्या एका महिला कर्मचार्याने सदर सार्वजनिक ठिकाणी जेवण वाढणार्या हातगाडीवाल्याला जाब विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात हे प्रकरण गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर सदरचे प्रकरण श्रीवर्धन नगर परिषदेकडे गेल्यानंतर श्रीवर्धन नगर परिषदेने सर्व अनधिकृत हातगाड्या श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरून उचलल्या होत्या. परंतु, एवढे होऊनही पुन्हा सर्व अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणारे श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थांची विक्री करताना पाहायला मिळत आहेत.
यामध्ये खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक जण श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीच्या व्यतिरिक्त इतर ग्रामपंचायत हद्दीतील किंवा बाहेरच्या तालुक्यातील असल्याचे दिसून येते. याबाबत श्रीवर्धनच्या स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेला विनंती केली होती की, हातगाड्या लावण्यासाठी केवळ स्थानिक नागरिकांना परवानगी द्यावी. अन्यथा श्रीवर्धन येथील स्थानिक नागरिक नगर परिषदेने बाहेरच्या व्यक्तीना परवानगी दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेदेखील वृत्त प्रसिद्ध झाले होते.
श्रीवर्धन समुद्रकिनारी हातगाड्या जरी नगर परिषदेच्या परवानगीने लागत असल्या तरी, सदर हातगाड्या लागण्याची जागा वन खात्याच्या मालकीची आहे. श्रीवर्धन शहराबाहेरच्या नागरिकांना श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी दिल्यामुळे स्थानिक नागरिकांवरती अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. तरी श्रीवर्धन नगरपरिषद व वनखात्याने पुनर्विचार करून श्रीवर्धन शहरातील नागरिकांनाच खाद्यपदार्थांच्या हात गाड्या लावण्यासाठी परवानगी द्यावी. बाहेरगावच्या लोकांना परवानगी देऊ नये. जेणेकरून स्थानिक नागरिकांचा रोजगार धोक्यात येईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.