महाड एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे कौटुंबिक वादातून चुलता आणि पुतण्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादाचे रूपांतर खुनी हल्ल्यात झाले असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जीवघेणे वार करण्यात आले आहेत. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाराम तुकाराम किर्वे (61) हे कुसगाव येथे नवीन घर बांधत आहेत. मात्र, त्यांच्या या नवीन घर बांधण्याचा राग मनात धरून त्यांचे पुतणे अंकुश रामचंद्र किर्वे आणि विलास रामचंद्र किर्वे यांनी गुरुवारी (दि.26) रात्री 10 च्या सुमारास बाळाराम यांच्यावर हल्ला केला. अंकुश आणि विलास या दोघांनीही बाळाराम यांच्या डोक्यात कशाने तरी गंभीर प्रहार केला. यात ते जखमी झाल्याने त्यांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दुसऱ्या तक्रारीत पुतण्या अंकुश किर्वे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चुलते बाळाराम किर्वे यांनी दारूच्या नशेत ‘जेवण चांगले झाले नाही’ या कारणावरून वाद घातला. बाळाराम यांनी अंकुश यांच्या पत्नीचा गळा दाबला. पत्नीला सोडवण्यासाठी अंकुश गेले असता, बाळाराम यांनी त्यांच्या मान आणि हातावर वस्तऱ्याने वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी बाळाराम किर्वे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोरेगावकर करत आहेत.






