अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा; भारताची विजयी सलामी

आफ्रिकेचा उडविला धुरळा, विकी ओसवालच्या पाच विकेट्स
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या अंडर 19 क्रिकेट विश्‍वचषकात विजयी सुरुवात केली. येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर ब गटातील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला. भारताचा पुढील सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी होणार आहे.
233 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. इथन जॉन कनिंगहॅम याला पहिल्याच षटकात राजवर्धन हंगरगेकरने बाद केले. त्यानंतर व्हॅलेंटाइन किटाईम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी दुसर्‍या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. परंतु, विकी ओसवालने किटाईमला 25 धावातच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्यामुळे ही भागीदारी खंडित झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नियमित अंतराने विकेट गमावणे सुरूच ठेवले. ब्रेव्हिस 65 धावांवर बाद झाल्यानंतर सातत्याने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स पडत गेल्या. आणि अखेरीस, 45 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताकडून विकी ओस्तवालने पाच विकेट्स घेतल्या तर राज बावाने चार गडी बाद केले.
तत्पूर्वी, कर्णधार यश धुलने 100 चेंडूत 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताने एकूण 232 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टने तीन गडी बाद केले. धुलशिवाय कौशल तांबेनेही 35 धावांची खेळी केली तर शेख रशीदने 31 धावा केल्या.

Exit mobile version