| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्याच्या विकासाचे गोडवे गाणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पहिल्याच पावसात तोंडघशी पडल्याचे चित्र समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की, प्रवाशांना आता रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी भुयारी मार्गाऐवजी अक्षरशः “तरण तलाव” पार करण्याची वेळ आली आहे.
उरण तालुक्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, स्थानकांना देण्यात आलेल्या चुकीच्या नावांबाबतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलेच, शिवाय आता स्थानकांच्या दर्जाहीन बांधकामाचेही पितळ उघडे पडू लागले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने उरणसह द्रोणगिरी रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गातील नियोजनाचा फज्जा उडवला आहे. सकाळी 9.47 वाजताची लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना भुयारी मार्गात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ज्या भुयारी मार्गांमध्ये पाणी साचले होते, त्याच ठिकाणी यंदाही पहिल्याच पावसात पाणी भरल्याने रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरून चालत स्टेशन गाठावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखादी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. तसेच, हा संपूर्ण परिसर खाडीलगतचा असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आधीपासूनच गृहित धरली गेली होती का? रेल्वेच्या तांत्रिक विभागाने भूगर्भ, भरती-ओहोटी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा याबाबत नेमका कोणता अभ्यास केला होता? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
भुयारी मार्ग की तरण तलाव?
