दर शनिवारी रंगावलीमधून हनुमंताची पूजा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून पोशीर या गावाची ओळख आहे. या गावातील हनुमान मंदिरात ऐतिहासिक महत्त्व असून, याच गावातील दोन रंगावली कलावंत दर शनिवारी पवनपुत्र हनुमंताची आकर्षक रांगोळी साकारतात. त्यांची ही अनोखी सेवा आणि रांगोळी समाज माध्यमांवर लोकप्रिय होत असल्याने परिसरातील भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहचत आहे. नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील पोशीर गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावातील हनुमंताचे मंदिर विशेष प्रसिद्ध असून, भक्तांच्या नवसाला पावणारा समजला जातो. या गावातील तरुण योगेश आगीवले आणि निलेश शिंगटे हे दोघे गेली अनेक शनिवार मंदिरात हनुमानाची वेगवेगळी रांगोळी साकारतात. या दोन्ही कलाकारांची रांगोळीमधून हनुमान सेवा या भागातील समाज माध्यमांवर विशेष लोकप्रिय होत आहे. भगवान हनुमानाचे श्लोक आणि हनुमंताच्या विविध छटा आपल्या रांगोळीमधून ते साकारत आहेत.
बजरंग बलीची विविध रूपे रांगोळीमधून साकारली जात असल्याने त्याची अनुभूती घेण्यासाठी असंख्य भक्त पोशीर गावातील मंदिरात येत आहेत. त्याचवेळी योगेश आगिवले आणि निलेश शिंगटे यांचेदेखील कौतुक होत आहे. मात्र, हे दोघे तरुण पवनपुत्र हनुमान सेवा म्हणून रंगावली साकारत असून, त्यासाठी येणाऱ्या खर्च कोणाचीही मदत घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सेवेबद्दल विशेष कौतुक होत आहे.