आधुनिक खोतीविरोधात संघटित व्हा: चित्रलेखा पाटील

| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |

स्व. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली 93 वर्षांपूर्वी चरीसह पंचक्रोशीतील हजारो शेतकरी सावकारांविरोधात एकवटले आणि त्यांनी ऐतिहासिक लढा उभारला. याच संघर्षातून चरीच्या शेतकरी संपाचा उदय झाला. या लढ्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने अन्यायाविरोधात उभे राहणे गरजेचे आहे. चरीच्या या चळवळीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. चरीचा संप ही अलिबागची शान आणि बाण आहे. हा ऐतिहासिक विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आजच्या भांडवलदारांविरोधात लढण्याची शक्ती चरीच्या संपाच्या प्रेरणेतून मिळते, असे प्रतिपादन शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

1 / 6


चरी संपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्याचे नियोजन उत्तम करण्यात आले असून, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. चरीच्या संपाचा इतिहास सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या लढ्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने अन्यायाविरोधात चळवळ उभी करणे आवश्यक आहे. सध्या देशात भांडवलदारांच्या माध्यमातून आधुनिक खोती पद्धत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. विकास होत असताना जमिनीवरील आपला हक्क अबाधित राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत, असा मोलाचा सल्लाही चित्रलेखा पाटील यांनी दिला.

त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून जात असताना वेगवेगळ्या माध्यमांतून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. संघटित शक्तीमध्ये प्रचंड सामर्थ्य असते, हे दिल्ली येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दाखवून दिले आहे. पूर्वी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही हजारो शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी चरीचा ऐतिहासिक संप घडवून आणला. प्रदीर्घ काळ चाललेल्या या संपाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली आणि त्यातून कुळ कायद्याच्या निर्मितीला चालना मिळाली. याच लढ्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आज ताठ मानेने जगू शकत आहेत, असेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version