माणगाव नगरपंचायतीत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात एकजूट

। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील राजकारणाचे मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात इतर सर्व पक्ष एकत्रित येण्याची चर्चा शहरात नाक्यानाक्यावर सुरु असून तशा प्रकारच्या हालचाली सुरु असल्याचे दिसून येत आहे. माणगाव नगरपंचायतीची सन 2021 ची निवडणूक काही दिवसांच्या अंतरावर लागल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सत्ता जाऊ नये यादृष्टीने विरोधी शिवसेना, आय काँग्रेस, भाजप, मनसे, शेकाप हे सर्व पक्ष मी माणगावकर म्हणून माणगाव विकास आघाडी तयार करून एकत्रित लढण्याच्या दृष्टीने विचाराधीन असून तशा प्रकारच्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. माणगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड क्र.1 मध्ये अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्र.2 मध्ये अनुसूचित जाती महिला, वॉर्ड क्र.3 मध्ये सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.4 मध्ये सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.5 मध्ये सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.6 मध्ये नामाप्र महिला, वॉर्ड क्र.7 मध्ये सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.8 मध्ये नामाप्र महिला, वॉर्ड क्र.9 मध्ये सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.10 मध्ये सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र. 11 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण, वॉर्ड क्र.12 मध्ये सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.13 मध्ये सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.14 मध्ये नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्र.15 मध्ये सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.16 मध्ये सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.17 मध्ये नामाप्र सर्वसाधारण असे आरक्षण पडले असून या निवडणुकीसाठी दि.1 ते 7 डिसेंबर या कालावधीत दि.4 व 5 शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस सोडून इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी दि.21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी दि.22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. एकंदरीत माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक चुरशीची होऊन अनेक वार्डांतून धक्कादायक निकाल लागणार हे मात्र तितकेच खरे आहे.

Exit mobile version