शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची : उल्का महाजन

। गडब । वार्ताहर ।
शेतकर्‍यांना आपली जमीन वाचावयाची असेल, तर शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी वडखळ येथे केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला असून, या प्रकल्पग्रस्तांची बैठक क्षेत्रेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली होती. बैठकीला सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, निलेश पाटील, राजन झेमसे, गजानन पेढवी, सदानंद ठाकूर, दिनेश म्हात्रे, हरिभाऊ पाटील, पांडुरंग तुरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

माणवाला जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य शेतीतूनच निर्माण होत असल्याने शेती वाचली तर देश वाचेल, ज्याच्या हातात जमीन असेल तोच राजा असेल, जमीन संपवायाची नाही, शेतीवर अनेकजण अवलंबून आहेत. या लढ्यात शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची आहे. औद्योगिकीकरणात जी जमीन जाते, ती मरते, त्या ठिकाणी गवताचे पातेदेखील उगवत नाही. ज्याच्या हातात जमीन आहे, त्याच्या हातात पुढच्या पिढीचे अस्तित्व असून, आपली जमीन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित व्हावे, असे आवाहन उल्का महाजन यांनी यावेळी केले.

Exit mobile version