माणगावात अज्ञाताने दोन वाहने पेटवली

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अजून एक भर पडली आहे. माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील बाळा वाघमारे यांच्या विलास, विनायक या मुलांची रिक्षा, प्रवासी वाहतूक गाडी कोणी अज्ञात इसमाने पेटवून दिल्या. ही घटना सोमवारी (दि.28)रात्री घडली. यामध्ये या दोन्ही गाड्यांची राखरांगोळी झाली असून, वाघमारे कुटुंबियांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. उदरनिर्वाचे साधनच हरविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या घटनेत वाघमारे यांच्या मालकीचे रिक्षा व मॅक्सिमो ह्या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. रात्री-अपरात्री माणगावमधील महाराणा प्रताप नगरमधील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायर कार खालीदेखील एका मनोविकृत व्यक्तीकडून आग लावण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला होता. मात्र, वाघमारे यांच्या गाड्या जाळणे ही घटना खूप क्लेशदायक आणि दुःखदायक आहे, असे मत माणगाव शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत. माणगाव शहरात घडणार्‍या अशा घटनांना आळा घालण्यासाठी माणगाव पोलिसांनी शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात, अशी मागणी माणगावकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. उतेखोल वाडी वाघमारे यांच्या गाडी जाळल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत.

Exit mobile version