कर्मचारी संघटनेचा मोर्चाचा इशारा
| उरण | वार्ताहर |
उरण पालिकेचे कर्मचारी संतोष पवार, मधुकर भोईर यांना नियमबाह्यपणे निलंबित करण्यात आल्याने कर्मचार्यांचे तीव्र नाराजी पसरली आहे. या दोघांना पुन्हा कामावार घ्यावे,या मागणीसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने शुक्रवारी 22 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे.
संतोष पवार यांनी कर्मचारी म्हणून पालिकेच्या प्रत्येक विभागात उत्कृष्ट सेवा दिलेली आहे. या कर्मचार्याला केवळ हॉस्पिटलच्या मागणीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, शैक्षणिक कार्यासाठी आणि शेतकरी-कामगार यांच्या अन्यायाविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून निलंबीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजात कसूर केली म्हणून सदरहू मुख्याधिकारी यांनी त्यांना सबळ कारण देऊन एकही नोटीस बजावलेली नाही. संतोष पवार हे उरण नगरपालिकेतील कर्मचारी आणि सफाई कामगारांचे नेतृत्व करतात.म्हणून कुणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांच्यावर ही अन्यायकारक कारवाई झालेली आहे.
दूसरे निलंबित केलेले कर्मचारी मधुकर भोईर हे सुद्धा नगरपालिकेचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत. भोईर आणि इतर तीन कर्मचारी यांनी त्यांच्या ड्युटीच्या वेळेत रात्री 1.30 ते 2.00 च्या अर्ध्या तासाच्या वेळेत फोन उचलला नाही या केवळ एका कथित कारणासाठी केवळ एकटे मधुकर भोईर यांनाच निलंबीत केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मधुकर भोईर यांना एकदाही नोटीस दिलेली नाही. मधुकर भोईर हे सफाई कामगारांचे नेतृत्व करतात म्हणून केवळ त्या आकसापोटी निलंबित केलेले आहे.
शहरातील सजग नागरिक म्हणून सदर मुख्याधिकारी यांचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांचा निषेध करण्यासाठी 22 जुलै नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन केले आहे. सदर मोर्चा आनंदनगर येथून 10.30 वाजता निघेल आणि राजपाल नाका, गणपती चौक, महात्मा गांधी चौक, नगराज नाका मार्गे नगरपालिका कार्यालयाकडे प्रस्थान करेल. सदरहू मोर्चाप्रसंगी राज्यस्तरावरील विविध कामगार आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
कर्मचारी संतोष पवार व मधुकर भोईर यांच्यावर कोणत्याही सूड बुद्धीने किंवा आकसापोटी कारवाई केलेली नाही. त्यांंच्याविषयीं माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही. शासकीय नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी तसेच प्रशासनाचे नियम पाळत नसल्याने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई केलेली आहे.
– संतोष माळी, मुख्याधिकारी