| महाड | प्रतिनिधी |
बैलगाडी शर्यत आयोजित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन न करता त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करीत विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल सुशांत रुपक जाधव, रा. आसनपोई, ता. महाड या तरुणावर महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील दहिवड या गावामध्ये बैलगाडीच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. शर्यत आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोरोनाचे नियमांचेदेखील काटेकोर पालन करण्यात यावेत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले होते. अटी आणि शर्तींचे पालन करण्यात आले नसल्याने त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी तसेच पशुसंवर्धन विभागाचे शर्यतपूर्वी जनावरांची तपासणी प्रमाणपत्र जनावरांकरिता शर्यतीच्या जागेवर प्रथमोपचाराची व्यवस्था, त्याचबरोबर आवश्यक असणारी तयारी करण्यात आलेली नव्हती. तसेच या शर्यतीच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन न करता गर्दीदेखील जमविण्यात आली होती. याबाबत तहसीलदार यांच्या आदेशावरुन तलाठी सुग्राम सोनावणे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार व्ही.पी. पवार करीत आहेत.
विनापरवाना बैलगाडी शर्यत; तरुणावर गुन्हा दाखल
