आरटीओच्या ताफ्यात अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल
| पालघर | प्रतिनिधी |
विरार परीसरातील वाढती वाहतूक समस्या आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आरटीओच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील नियंत्रण अधिक कडक होणार आहे. या नव्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये प्रगत रडार प्रणाली, उच्च दर्जाचे कॅमेरे आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही वाहने रस्त्याच्या एका ठिकाणी उभी राहून आजूबाजूच्या परिसरातील वाहनांवर लक्ष ठेऊ शकतात. वाहनांचा वेग, चुकीचा लेन बदल, ओव्हरटेकिंग, तसेच संशयास्पद हालचाली रडारद्वारे सहज ओळखल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे वाहनचालकाने नियम मोडताच काही क्षणातच ई-चलान तयार होणार आहे. यासाठी वाहन थांबवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तपासणी अधिक जलद आणि पारदर्शक होईल. आरटीओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही प्रणाली तासाला सुमारे 800 चलान काढण्याची क्षमता ठेवते. या हायटेक यंत्रणेमुळे चोरीची वाहने, बेकायदा नंबर प्लेट वापरणारी वाहने तसेच संशयास्पद वाहनांवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. अपघात झाल्यास इंटरसेप्टर वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सहभागी होऊ शकते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत. तसेच, नव्या प्रणालीमुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर आळा बसण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील शिस्त सुधारून अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
