कार्लेखिंड ते कनकेश्‍वर फाटा मार्गावर चाबकाने मारणार्‍या ‘त्या’ दोघांबद्दल मोठा खुलासा…पिडीतांनी दिली माहिती

। अलिबाग । नेहा कवळे ।
गेल्या आठवड्याभरापासून कार्लेखिंड ते कनकेश्‍वर फाटा मार्गावर अज्ञातांकडून मारहाण होत असल्याच्या घटनेने संपूर्ण अलिबाग तालुका भयभीत झाला आहे. याबाबत परहुरपाडा येथील ग्रामस्थ विजय थळे यांच्या सहकार्याने पिडित व्यक्तींचा शोध घेतला असता चंद्रकांत मल्हार यांनी सारा प्रकार कृषीवलला सांगितला.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी चंद्रकांत मल्हार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरुन मोटारसायलने प्रवास करीत होते. सोगाव येथे आले असता पाठीमागून येणार्‍या मुलांनी त्यांच्या पाठीवर चाबकाने किंवा केबलने मारहाण केली. तसेच थोड्याच अंतराव सायलने प्रवास करणार्‍या सुरेंद्र घरत यांच्या डोक्यात तसेच पाठीवर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पायी जाणार्‍या इसमावरही हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यांनंतर हतबल न होता चंद्रकांत मल्हार त्यांनी त्या मुलांचा पाठलाग केला. मात्र ते दोघेही पसार झाले.

पिडीतांमध्ये सायकलवरुन प्रवास करणारे सुरेंद्र घरत यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तातडीने याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे चंद्रकांत मल्हार यांनी सांगितले. याप्रकरणात ग्रामस्थ विजय थळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण पहारा देत आहेत. मात्र अद्यापही ते सापडले नाहीत. त्यामुळे स्थानिक, पर्यटक यांनी रात्रीच्या सुमारास या मार्गावरुन प्रवास न करण्याचा सल्ला स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

18 ते 22 वयोगटातील मुलांकडून हल्ला
विनाकारण हल्ला करणार्‍या त्या आरोपींमध्ये एक 16 ते 17 वयोगटातील तर दुसरा 22 ते 23 वयोगटातील मुलगा असल्याचे चंद्रकांत मल्हार यांनी सांगितले. त्यांच्या गाडीवरील नंबरप्लेटवर कापड लावल्याने गाडीचा नंबर बघणे शक्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रात्री आठच्या सुमारास पाठीमागून अचानक चाबकाने अथवा केबलने मारण्यात आले. क्षणभर काही सुचलेच नाही. मात्र मारण्याचे कारण काय, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी एका सायकलस्वाराला मारल्याचे दिसले. त्यापुढे पादचार्‍यालाही त्यांनी त्याचप्रकारे मारहाण केली. त्यांना पकडण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ते पसार झाले.

-सुरेंद्र घरत, पिडीत

गेल्या गुरुवारी (दि.28) मापगांव फाट्याजवळून चालत जात असताना पाठीमागून येणार्‍या मोटारसायकलवरील मुलांनी काठीने पाठीवर मारले. अचानक हल्ला झाल्यानंतर मी आरडाओरड केली. रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. गेले अनेक वर्षे या मार्गावरुन पायी प्रवास केला. मात्र अशी घटना कधीही घडली नाही. ही घटना गंभीर असून पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याची गरज आहे.

– प्रशांत जोशी, पिडीत

Exit mobile version