| सोगांव | वार्ताहर |
पावसाळा संपून बराचसा कालावधी लोटूनही अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्य़ाने या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करावी, अशी मागणी मापगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच उनिता थळे यांनी दि.8 रोजी एका निवेदनाद्वारे अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. निवेदन देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्यासोबत समीर ठाकुर, प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, श्रीराम घरत, श्रीकांत घरत, शुभम घरत, नितीन पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड दरम्यानचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम अलिबागच्या अखत्यरित येतो. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुनवली, सोगांव, चोरोंडे, टाकादेवी, परहुरपाडा, परहूर, गोठेघर आदी गावांच्या हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या घरांतील नागरिकांसह या रस्त्य़ावरून प्रवास करणारे पर्यटक तसेच सर्वच प्रकारच्या वाहनांना त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरच दुरुस्ती व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांनी दिली.







