माणगावकरांवर अवकाळीचे संकट!

आंबा, काजू बागायतदार अडचणीत तर 120 हेक्टर भातपिकावरही संक्रांत

| माणगाव | वार्ताहर |

गेली चार पाच दिवसापासून रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने उग्ररूप धारण केले असून अवकाळी पावसाचा मारा कांही पाठ सोडता सोडेना यामुळे माणगाव-तळा तालुक्यासह जिल्ह्यातील अंबा, काजू, बागातदारां बरोबरच माणगाव तालुक्यातील 120 हेक्टर क्षेत्रावरील तयार झालेल्या भातपिकावर संक्रांत कोसळली आहे. त्यामुळे रायगडावर अवकाळी पावसामुळे मोठे संकट उभारले आहे. रब्बी हंगामातील हातातोंडाला आलेले भातपीक शेतकऱ्यांच्या शेतात उभे आहे. तर कांही ठिकाणी या भातपिकाची कापणी सुरु केली आहे. त्यांमुळे शेतकरी मोठया समस्येला तोंड देत असून त्याला अवकाळी पावसाच्या कळा निमुटपणे सहन कराव्या लागत आहेत.

सकाळी कडक उन, घामाच्या धारा, दुपारनंतर अचानक सुरु होणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे एक वेगळे विचित्र वातावरण तयार झाले असून माणगाव-तळा तालुक्यात सह अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात, अंगणात भात कापून ठेवला आहे. त्याच्या मळण्या काढण्याचे काम जोरात सुरु आहे. माणगाव तालुक्यात रब्बी हंगामात यंदा 120 हेक्टर जमिनीवर भाताचे पिक शेतकऱ्यांनी घेतले आहे. ते कापण्याचे काम सुरु आहे. अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सतत होणाऱ्या हवामानातील बदलाकडे लक्ष ठेवून उशिरा कापणी सुरु केली आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. कापलेल्या भात पिकाची मळणी शेतकऱ्यांनी थांबवली आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर कांही शेतकऱ्यांकडे निवारा नसल्याने त्यांच्या भाताचे नुकसान होत आहे.

दिवसभर आकाश निरभ्र राहून दुपारनंतर मात्र अचानक हलक्याशा पावसाच्या अचानक सरी पडतात त्यामुळे मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तर कोकण रब्बी हंगामातील कोरडवाहू शेतकरी कालव्याच्या पाण्यावर भातपिक घेतो. रायगड जिल्ह्यातही मोठया प्रमाणात काजू, अंबा बागायतदार मोठ्या प्रमाणात आहेत. आंबा फळ हे पूर्ण झाले असून यामुळे हा धोका अंबा, काजू उत्पादकांसमोर उभा आहे. या पिकावर अनेक फळ उत्पादक शेतकरी अवलंबून आहे. ते ही पिक निसर्गाने काढून घेल्यास करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. माणगाव तालुक्यात भात पिकाची कापणी मोठ्या प्रमाणात सुरु असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

Exit mobile version