शेतकरी हतबल, व्यावसायिक धास्तावले
| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्याला विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि. 4) चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील अलिबागसह पेण, खोपोली, कर्जत, नेरळ, माथेरान, पनवेल, महाड, पोलादपूर आदी सर्वच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. या पावसात आंबा, काजू बागायतदार शेतकर्यांसह वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. गुरांचा चारा भिजल्याने चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काढणीयोग्य आंब्यावर अवकाळी धडकल्याने पीक खराब होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकर्याला आहे. विवाहसमारंभ, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमी उभारलेले मंडप भिजल्याने यजमानांसह आयोजकांची धावपळ झाल्याचे पाहावयास मिळाले.
रसायनीत मंडप भिजून नुकसान
मोहोपाडा रसायनीसह चौक परिसरात साधारण पाच वाजता पावसाचे आगमन झाले. जोरदार वारा आणि पावसाने आंबे, काजू, कोकम, पेरू, पपई पडून नुकसान झाले आहे. जनावरांचा चारा भिजून गेला, तर वीटभट्टी मालकांची तारांबळ उडाली आहे, त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी साखरपुडा साठी बांधलेले मंडप भिजून नुकसान झाले आहे. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही प्रकारची जीवित अथवा नैसर्गिक हानी झालेली नाही. वासांबे महसूल अधिकारी श्रीनिवास खेडकर यांनी सांगितले.
महाड आगाराला तलावाचे स्वरूप
अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीने महाड एसटी आगाराला तलावाचे स्वरूप आले. या ठिकाणी लाखो रुपयांचे काँक्रिट काम केल्यानंतरदेखील उर्वरित भागामध्ये पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे रूप आले. यामुळे सकाळीच एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांना या पाण्यातून वाट काढत एसटी पकडावी लागली. प्रवाशांनी एसटी महामंडळ व आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक महाड शहरातील महाड एसटी आगारामध्ये काही दिवसांपूर्वी काँक्रिट करण्याचे काम करण्यात आले. एसटी स्थानकाच्या चहूबाजूने भराव आणि इमारती झाल्याने या ठिकाणी कायम पाणी साचण्याचे प्रकार घडत होते. यामुळे महाड एसटी आगारामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून काँक्रिटीकरण काम करून उंचवटा निर्माण करण्यात आला. ज्या ठिकाणी मुंबई आणि लांब पल्ल्याच्या गाड्या उभ्या राहतात, त्या ठिकाणी हा उंचवटा केल्यामुळे आगारातील आतील बाजूस आणि स्थानकाच्या जुन्या इमारतीमधील भागामध्ये आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी तुंबून राहिले. पाणी एकाच ठिकाणी साचून राहिल्याने ऐन उन्हाळ्यात आगारात चिखलाचे साम्राज्य पसरले. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती तर पावसाळ्यात महाड आगाराची काय परिस्थिती होईल, असा संतप्त सवाल अनेक प्रवासी महाड आगार व्यवस्थापनाला विचारत आहेत.
महाड एसटी आगारामध्ये करण्यात आलेले काम हे नियोजनबद्ध नसल्यामुळे शासनाचे पर्यायाने नागरिकांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. आगारातील मोजकाच भाग काँक्रिटीकरण कामामुळे उतार निर्माण होऊन अन्य भागामध्ये पाणी तुंबून राहिले आहे. सदर काम सुरू असतानाच अनेकांनी याबाबत महाड एसटी आगाराला सूचना दिल्या होत्या. मात्र, ठेकेदाराचे भले करण्यासाठी निघालेल्या प्रशासनाने या सूचनांकडे दुर्लक्ष करत लाखो रुपयांची उधळण केली आहे, अशी चर्चा आहे. एसटी आगाराची नवीन इमारत निधीअभावी अपूर्ण असतानाच तसेच जुन्या इमारतीवर खर्च करण्यासाठी निधी नसल्याचे कारण देणार्या प्रशासनाने हा खर्च कशासाठी केला, असा प्रश्नदेखील निर्माण होत आहे.
अवकाळी पावसामुळे घरांचे पत्रे, शाळेची कौले उडाली
अचानक आलेल्या वादळ वार्यामुळे पावसाने जोर धरला आणि जणू काही घरांचे होत्याचे नव्हते झाले आणि पाहता-पाहता याच वादळवाल्यामुळे घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. पेण तालुक्यातील खरोशी येथील बागवाडीजवळील शिवचंद वसंत पदमाकर गावंड यांच्या घरावरील असणारे 20 ते 22 पत्रे उडाले.

परिणामी, घराचे खूप नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कृष्णा रामभाऊ घरत यांच्याही घरावरचे चार ते पाच पत्रे उडाल्याने त्यांचीही मोठी तारांबळ झाली. हा हा म्हणता पावसाने जोर धरला. मात्र, आपला जीव वाचवण्यासाठी घरातील माणसांनी दुसर्या ठिकाणी सहारा घेतला. यामध्ये घराचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच राजिप प्राथमिक शाळेवरील कौले उडाली असून, शाळेचे नुकसान झाले आहे. खरोशी गावातील घरांवरील कौले उडाली आहेत. याबाबत पोलीस पाटील व सरपंच यांनी तात्काळ वरिष्ठांना फोनद्वारे कळवले आहे. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तलाठी सजा जिते यांना तात्काळ पाहाणी करून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी पाठवले आहे.