जिल्ह्यात अवकाळीचा फेरा; शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान

वीटभट्टी आणि सुपारी व्यावसायिक चिंतेत
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले.याशिवाय वीटभट्टी आणि सुपारी व्यावसायिकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अवकाळी पावसाचा परिणाम अनेक ठिकाणच्या आठवडी बाजारावर दिसून आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. वीट उत्पादक, शेतकरी, फिरते विक्रेते व छोटे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. प्लास्टिक कागद व ताडपत्री खरेदीसाठी गर्दी झाली.
अरबी समुद्रात तयार झालल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यात काल सकाळपासूनच पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळी पावसाचा गरव्या जातीचे भात, रब्बी हंगामातील कडधान्य, भाजीपला, पांढरा कांदा तसेच आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्याता आहे. त्याचबरोबर आंबा पिकावरही या नासाड्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार चिंतातूर झाले आहेत.
याचबरोबर मच्छीमारानाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज पाऊस थांबला असला, तरी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍याकडून होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यांसह पाऊस पडण्याची शक्याता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत काल सकाळपासून रायगड जिल्ह्यात पाऊस पडण्यात सुरूवात झाली आहे. आणखी 2 दिवस पाऊस पडणार आहे.
रायगड जिल्ह्यात काही भागात गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हा भात उशिरा पिकतो. त्यामुळे त्याची कापणी देखील उशिराने केली जाते. कापणी न केलेल्या गरव्या जातीच्या भातपिकाचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात 4 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कडधान्य व भाजीपाला लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात भात कापणी नंतर पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते.
या पावसामुळे शेतात पाणी साचून राहीले आहे. तर त्यामुळे नुकतीच रूजून आलेली कडधान्य व भाजीपाल्याची रोपे कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पांढर्या कांद्याच्या पिकाचे देखील काही प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे यंदा कडधान्य, भाजीपाला व पांढर्या कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

जेवाद चक्रीवादळाचा इशारा
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्‍चिम दिशेला पुढे सरकेल. 4 डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागाला धडकेल.महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामानातील बदलांमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Exit mobile version