। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना अभियान 2021 राबविले जात आहे. बुधवारी (ता.1) या अभियानाला सुरुवात झाली असून, यानिमित्त पोषण महिना कालावधीत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्या योजनांची व्यापक प्रसिध्दी करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करून राबविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय पोषण महिना कालावधीत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभाग संखिकी विस्तार अधिकारी रंजिता थळे, एनआरएचएम जिल्हा कार्यक्रम अधिकारी चेतना पाटील,पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, महिला व बालकल्याण विभाग कनिष्ठ प्रशासन अधिकारी विद्यानंद म्हात्रे उपस्थित होते.