ताराराणी ढोलताशा पथकाचे अनावरण

मुंबई, पुण्याच्या पथकाची मक्तेदारी संपुष्टात आणावी
खा. सुनील तटकरे यांचे आवाहन

। कोर्लई । वार्ताहर ।
यापूर्वी महिलांचे ढोलताशा पथक म्हणजे मुंबई, पुण्याच्या महिलांची मक्तेदारी मानली जात असे. मुरुडच्या ताराराणी महिला पथकाने त्यांच्याहून काकणभर सरस कामगिरी करीत त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणावी, असे आवाहन खा. सुनिल तटकरे यांनी मुरुडमध्ये बोलताना केले.

मुरुडच्या रणरागिणी महिला कलामंचाच्या ताराराणी ढोलताशा पथकाचा अनावरण समारंभ त्यांच्या हस्ते मुरुडच्या हिंदू बोर्डिंगच्या पटांगणावर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील महिलांनाही या ढोलपथकाच्या माध्यमातून आपले कौशल्य पणाला लावून सूर, ताल, लय, ठेका व नंतर ठोका साधत प्रगती करावी. शुभारंभाचा उत्साह कायम ठेवत व वेळापत्रक अचूक साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महिलांसाठी रोजगाराच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणवर्गाचे आयोजनही करण्यात यावे, त्यासाठी आपण सर्वतोपरीने सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

याप्रसंगी मुरुड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मंगेश दांडेकर, सुपारी संघाचे अध्यक्ष अविनाश दांडेकर, माजी सभापती स्मिता खेडेकर, आशिका ठाकूर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, फैरोज घलटे, विजय पैर, संजय गुंजाळ, आदेश दांडेकर, यवराज भगत, सुनील विरकुड, विजय भोय, डॉ. भाविका कल्याणी, मदन हणमंते, अ‍ॅड. मृणाल खोत आदी उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात पेंडसे मॅडम यांनी ढोलताशा पथकाच्या निर्मितीसाठी खा. तटकरे यांनी सर्वतोपरीने मदत केल्याचे सांगून अलिबाग, नांदगाव येथील प्रशिक्षक शिक्षण देत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शेडगे यांनी, तर उपस्थितांचे आभार राधिका उपाध्ये यांनी मानले.

Exit mobile version