ताराराणी ब्रिगेडचे जि.प. सीईओंना निवेदन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणारे माँसाहेब जिजाऊंच्या समाधी स्थळाजवळ असणारे जिजामाता सभागृहाची पडझड झाली आहे. त्यामुळे राज्य व देशभरातून येणार्या शिवप्रेमी , इतिहासप्रेमी, अभ्यासक यांची गैरसोय होतेय, सदर सभागृहाची जलद दुरुस्ती करून हे सभागृह सुसज्ज करावे अशी मागणी ताराराणी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वंदना मोरे यांनी केली आहे.
या संदर्भातील मागणीचे निवेदन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांना देण्यात आलेय. ऐतिहासिक किल्ले रायगड व पाचाड येथे वर्षभरात विविध स्फूर्तिदायक व प्रेरक कार्यक्रम होत असतात.पाचाड येथे माँसाहेब जिजाऊ जयंती सोहळा व स्मृतिदिन साजरा करण्यात येतो . यावेळी बहुसंख्येने शिवप्रेमी उपस्थित असतात. पडझड झाल्यामुळे सभागृहाचा वापर करणे शक्य होत नाही शिवप्रेमींची गैरसोय होते. सदर सभागृह हे रा.जि.प.च्या अखत्यारी मध्ये आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सभागृह कामास दुरुस्ती निधी उपलब्ध करून दिल्यास या सभागृहाचा वापर विविधांगी उपक्रमासह शिवप्रेमींना देखील राहण्यासाठी उत्तम सोयीचे होईल, तरी या सभागृहाची डागडूजी करण्यात यावी,अशी मागणी वंदना मोरे यांनी केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा कविता खोपकर, जिल्हाध्यक्ष वर्षा मोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी सभागृह कामास दुरुस्ती निधी मंजूर करून लवकरच हे काम पूर्ण होईल असे आश्वासित केले.