दहीहंडी स्पर्धेच्या चषकाचे अनावरण

अलिबागमध्ये रंगणार शेकाप पुरस्कृत उत्सवाचा जल्लोष

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील शेकाप भवनातील सभागृहात मंगळवारी (दि.12) महिला व पुरुष गोविंदा पथकाच्या चषकाचा अनावरण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे.

मानाचा व प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा सोहळा शनिवारी (दि.16) अलिबाग शहरात दुपारी तीन वाजल्यापासून रंगणार आहे. यानिमित्ताने अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, सतीश प्रधान, शेकाप शहर चिटणीस अनिल चोपडा, संदीप शिवलकर, नील नाईक आदी मान्यवरांसह गोविंदा पथकांचे प्रतिनिधी, मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरुवातीला भव्य दिव्य अशा दोन्ही चषकांचे (मानाची गदा) अनावरण अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित याही वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समितीच्या गठीत करण्यात आल्या आहेत. शंभरहून अधिक सदस्यांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. गोविंदा पथकाच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांसह रुग्णवाहिका आदी वैद्यकीय पथके असणार आहेत. सर्वांना उत्सव आनंदमय व शांततामय वातावरणात पाहता यावा, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घरबसल्यादेखील या उत्सवाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या गोविंदा पथकांना अटी व शर्तींची माहिती यावेळी देण्यात आली. नेमण्यात आलेल्या समितीची माहिती देऊन योग्य ती जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्याची सूचना केली.

रायगड जिल्ह्यामध्ये कृष्णजन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी गोपाळकाला सण साजरा केला जातो. यानिमित्ताने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी अलिबागमध्ये दहीहंडी फोडण्याचा थरार पाहावयास मिळणार आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जात आहे.

गोविंदा पथकांना मिळणार लाखोंची बक्षिसे
दहीहंडी स्पर्धेसाठी 53 गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. त्यात महिला गोविंदा पथके 25 आणि पुरुष गोविंदा पथके 28 आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे. अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे 51 हजार 111 रुपये व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 33 जणांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.
स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ विशेष पारितोषिक
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांचे राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ यावर्षी विशेष पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पुरुष गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्यास त्या पथकाला एक लाख रुपये आणि महिला गोविंदा पथकाला 50 हजार रुपयांचे अतिरिक्त पारितोषिक देण्यात येणार आहे.

Exit mobile version