स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कोरळवाडीत रस्त्यासाठी उपोषणाची वेळ

उप वनसंरक्षक कार्यालयासमोर कोरळवाडी आदिवासींचे बेमुदत उपोषण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी देशभर मोठया प्रमाणावर जोरदार तयारी सुरु असतानाच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोरळवाडीतील आदिवासींना आजही मुलभूत हक्क असणार्‍या रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याची वेळ ओढवली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी दोन अडीच वर्षांपासून निधीदेखील मंजुर झाला आहे. मात्र वनखाते करीत असलेली आडकाठी मुळे ही वेळ ओढवली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर आदिवासींचे बेमुदत उपोषण सुरू झाले असून त्यांना मिळणार्‍या सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यावर आमरण उपोषण करण्यास भाग पडले आहे. आज भारत देश वासीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सण साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी मात्र मूळ सुविधांपासून वंचित आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 160 आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अश्याच वाडयांपैकी पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरललवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी मिळून मागील दीड वर्षापासून निधी पडून आहे. परंतु वनविभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर आज दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी कोरलवाडी येथील ग्रामस्थानीं ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील दीड वर्षांपासून आदिवासींच्या रस्त्याचा निधी विना वापर असाच पडून आहे.
मात्र वन विभाग जाणीव पूर्वक टाळाटाळ करीत असल्यामुळे अश्या वन अधिका-यांवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करून तात्काळ मंजूरी दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते गुरुदास वाघे, भानुदास पवार, हरिश्‍चंद्र वाघे, संतोष पवार, सचिन वाघे, महेंद्र वाघे, राजेश वाघे, अनिल वाघे, अक्षय घाटे, सुनील वाघे, रवींद्र वाघे, लक्ष्मण पवार आणि रमेश वाघे यांनी केला आहे.
आपटा ग्राम पंचायतीचे उप सरपंच वृषभ धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर एडवोकेट आकाश मात्रे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनीही या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.

Exit mobile version