| उरण | वार्ताहर |
उरण येथील शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित येते. या ठिकाणी अधिकृत बुकिंग झालेले नसल्यास, येथील काही स्थानिक कर्मचारी या खोल्या परस्पर पैसे घेऊन सर्रास राहण्यासाठी देतात. काही खोल्यांमध्ये अनेक जण दुपारच्यावेळी अनधिकृतरित्या झोपलेले असतात. विश्रामगृहाच्या आवारात दारूच्या बाटल्याही फेकलेल्या असतात. त्यामुळे या विश्रामगृहात ओल्या पार्ट्या तर रंगत नसतील? असा प्रश्न उपस्थित होते. वास्तविक, शासकीय विश्रामगृहात राहण्याची अधिकृत परवानगी असेल तरच ते दिले जाते. येथील विश्रामगृह मात्र, ‘आओ जाओ घर तुम्हाला’ असे झाले आहे. याबाबत अधिकारीवर्गाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
विश्रामगृहाचा होत असलेला गैरवापर थांबवावा, अशी मागणी होत आहे. खोल्यांची दुर्दशा, विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. मात्र, हा सर्वच्या सर्व निधी खर्च केला जात नसल्याचे खोल्यांच्या स्थितीवरून दिसून येते. खोलीतील सोपा, खुर्च्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. खोल्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणच घाण साचली आहे. त्यात संडास बाथरूमची दुरवस्था बघून न जाणे पसंत करतात.