काँक्रीटच्या जंगलाने वाढवली उष्णता
| उरण | प्रतिनिधी |
मोसमी पावसाने माघार घेताच उरणमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळपासूनच उकाडा आणि दमटपणा जाणवत असून, दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. थंडीची चाहूल लागण्याऐवजी उरणकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने ‘ऑक्टोबर हिट’ची चर्चा सुरू झाली आहे.
उरणमध्ये झपाट्याने वाढणारे काँक्रीटचे जंगल, डोंगरांचे सपाटीकरण, झाडे-झुडपांची होत असलेली कत्तल आणि मोकळ्या जागांचा कमी होत चाललेला परिसर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यातच रासायनिक उद्योग व विविध प्रकल्पांचा वाढता विस्तार यामुळे नैसर्गिक वातावरणावर ताण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वी हिरवाईने नटलेल्या उरणमध्ये आता सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींची गर्दी वाढत आहे. डोंगर, झाडी आणि नैसर्गिक जलस्रोत कमी होत असताना जमिनीवर वाढणारे काँक्रीटचे आच्छादन उष्णता अधिक काळ साठवून ठेवत असल्याने स्थानिक तापमानावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
वाढत्या उकाड्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत असून, ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखीसारख्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांकडे धाव घेत
आहेत. मात्र, या आजारांची नेमकी कारणे आणि त्यांचा वाढत्या तापमानाशी संबंध याबाबत अधिकृत वैद्यकीय आकडेवारी आवश्यक आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हापासून सावध राहावे, पुरेसे पाणी प्यावे आणि त्रास जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी डोंगर, झाडे-झुडपे, मोकळ्या जागा आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्याची गरजही व्यक्त होत आहे. हिरवाई तोडून काँक्रीटचे जंगल उभे केले, आता त्याच काँक्रीटची उष्णता उरणकरांच्या अंगावर येताना दिसत आहे.
