| उरण | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरण नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या सुसज्ज इमारतींचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामटात संपन्न झाला होता. उद्घाटन होऊन दीड ते दोन महिने होण्यास येऊनही अद्यापपर्यंत नवीन वास्तूमध्ये कार्यालय सुरू झालेले दिसत नाही. सदरची नवीन वास्तू ही कुत्र्याचे आश्रयस्थान बनली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. सदरचे बांधकाम ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते.
उरण नगरपालिका हद्दीतील अनेक विकासकामांचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामटात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते. या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी मोठमोठ्या वल्गना करीत आपली पाठ आपणच थोपटून घेतली होती. त्यावेळी येथील जनतेला आपला पक्ष किती जनहितांची कामे करतो हे बिंबविण्याचा प्रयत्न केला. कारण, काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता. हा एकप्रकारे मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न होता.
सदर नगरपालिका व इतर कार्यालयाचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला होता. त्याला आता दीड ते दोन महिन्याचा अवधी होण्यास येऊनही अद्यापपर्यंत उरण नगरपालिकेचे कार्यालय हे जुन्याच इमारतीमध्ये सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन वास्तूमध्ये नगरपालिका कार्यालय सुरू होईल, असे कर्मचार्यांना वाटत होते. परंतु, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सदरचे सर्व बांधकाम ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे समजते. तसेच अनेक कामांचा ठेकेदार ही एकच असल्याची धक्कादायक माहिती आहे. अधिकारी वर्गाकडे याबाबत विचारणा केली असता ते यावर काहीच उत्तर अथवा माहिती देण्यास टाळाटाळ करतात. एवढा येथील राजकीय पक्षाचा दबाव अधिकारी वर्गावर असल्याचे उघड होते.
नगरपालिकेच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वी होऊनही अद्याप पर्यंत नवीन वास्तूत कार्यालय सुरू झालेले नाही. सदरचे कार्यालय धूळखात पडले असून अद्याप आतील काम अपूर्ण असल्याची माहिती अधिकारी वर्ग देतात. मात्र सदरची नवीन वास्तू ही कुत्र्याची आश्रयस्थान बनली असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर याबाबत महाविकास आघाडीकडून सखोल चौकशीची मागणी करून भ्रष्टाचार उघड करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी दिली.