उरण ओएनजीसीची पाईप लाईन लिकेज

। उरण । वार्ताहर ।

ओएनजीसी कंपनीमधील अंत्यत जुनी असलेली पाईपलाईन लिकेज होऊन तेल गळती सुरू झाली. सदरची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडून त्वरित लक्षात आल्याने कंपनी प्रशासनाकडून उपाययोजना केल्याने भीषण दुर्घटना टळली आहे.

पिरवाडी समुद्र किनारी असलेल्या पाईपलाईनमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर लगेच प्रशासनाच्या लक्षात आल्यावर लगेच लिकेज झालेला पाईपलाईन खोलून तेल गळती थांबविण्यासाठी घटनास्थळी काम सुरू केले. यामुळे तेलगळतीनजीक असलेल्या समुद्रात झाली नसल्याचे दिसते. यापूर्वी अनेकवेळा अशाप्रकारची तेलगळती होऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना वारंवार घडूनही ओएनजीसी प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे या घटनेवरून उघड होत आहे.

दोन वर्षांपूर्वी याच पाईपलाईनच्या बाजूलाच तेल गळती होऊन समुद्रात मोठ्या प्रमाणात पसरून माशांवर त्याचा परिणाम झाला होता. त्यानंतर सदरची पाईपलाईन ही बदलून नव्याने टाकली जाईल असे सांगितले जात होते. परंतु तसे न झाल्याने आज पुन्हा तेल गळती झाली आहे. ज्यावेळी कंपनी सुरू झाली. त्यावेळी म्हणजे 40 ते 45 वर्षापूर्वी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरची पाईपलाईन जीर्ण झाली असून ती मुदतबाह्य झाल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे उरण तालुक्यातील ओएनजीसी प्रकल्प हा तेल आणि नैसर्गिक वायू संकलन करणारा प्रकल्प आहे. खोल अरबी समुद्रामध्ये बाँबेहाय नामक तेल विहिरीमधून काढण्यात येणारे तेल आणि नैसर्गिक वायू या प्रकल्पमध्ये समुद्राच्या तालाशी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून आणण्यात येते. यांनंतर या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून, त्याचे वितरण करण्यात येते. बाँबेहायपासून ओएनजीसी प्रकल्पामध्ये आलेल्या पाईपलाईन लिकेज होण्याची घटना आज घडली याची योग्य ती खबरदारी घेतली नाहीतर भविष्यात उरणचा नव्हेतर त्याचे दुष्परिणाम रायगड व मुबंई शहरालाही मोठ्या प्रमाणात सोसावे लागणार आहेत.
अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊनही तहसील, पोलीस, नागाव ग्रामपंचायत, व पंचायत समिती प्रशासन याकडे लक्ष देतील की आपला स्वार्थ साधून जनतेच्या जीवाशी संतप्त उरणवासी व नागाव ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version