एजन्सी बंदमुळे प्रशासनाचा गोंधळ उघड
| उरण | प्रतिनिधी |
शकुंतला गॅस एजन्सीचे लायसन्स निलंबित झाल्यानंतर उरण तालुक्यात घरगुती गॅससाठी नागरिकांची अक्षरशः परवड सुरू झाली आहे. उरण चारफाटा येथे ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी भर उन्हात तासन्तास सिलेंडरसाठी उभी राहत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागत असून, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंतही नंबर लागत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तहान-भूक विसरून नागरिक रस्त्याच्या कडेला सिलेंडर घेऊन उभे राहत असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्राहकांच्या तक्रारी आणि सातत्यपूर्ण पोलखोलीनंतर संबंधित एजन्सीवर कारवाई करत पुरवठा बंद करण्यात आला असला, तरी पर्यायी व्यवस्थेतील गोंधळामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पनवेल गॅस सर्विस व सुविधा गॅस एजन्सीकडे कनेक्शन वर्ग करण्यात आले असले, तरी अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक न झाल्याने ग्राहकांना स्वतः येऊन सिलेंडर घ्यावा लागत आहे. दरम्यान, ग्राहकांनी गॅस बुकिंग करताना जुना कंझ्युमर नंबर वापरावा तसेच घरपोच सेवा सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत अडचणी कायम असल्याचे चित्र आहे.
उरण चारफाटा येथील विक्री बंद केली असून, ती आता सोमवारी (दि.27) पासून पनवेल गॅस सर्विसचे कार्यालय नवीन पत्त्यावर स्थलांतरित होत आहे. ते पुढीलप्रमाणे शॉप नं. 3, स्टार होम बिल्डिंग, प्लॉट क्र. 11, सेक्टर 52, प्रजापती बिल्डिंग समोर, द्रोणागिरी या ठिकाणी आहे. याची ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
दरम्यान, वारंवार होणाऱ्या गैरसोयीमुळे संतप्त झालेल्या उरणकरांकडून गॅस पुरवठा सुरळीत व वेळेवर सुरू करण्याची जोरदार मागणी होत असून, प्रशासनाने तातडीने अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक करून गावोगावी पूर्ववत पुरवठा सुरू करावा अशी मागणी संतप्त ग्राहकांकडून केली जात आहे.







