उरण होणार पाणीटंचाई मुक्त

जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे प्रस्तावित

| उरण । वार्ताहर ।

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेमुळे उरण तालुका हा पाणीटंचाई मुक्त तालुका होणार आहे. तालुक्याच्या 20 गावांमध्ये तब्बल 13 कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. या योजना पुर्ण झाल्यानंतर तालुक्यातील पाणी टंचाई संपुष्टात येणार आहे.

देशातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 ला जल जीवन मिशन योजना सुरू केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अर्थिक सहभागाने ही योजना संपुर्ण देशात राबविली जात आहे. पाच वर्षामध्ये या योजनेत 3.60 लाख कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत तालुक्यातील 20 गावांमध्ये ही पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार असून त्या करीता 13 कोटी रूपयांचा आराखडा बनविण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि उरण तालुक्यातील प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजना यांच्या मार्फत या योजना राबविण्यात येणार आहे. या विस गावांपैकी 4 गावांमध्ये या योजनेचे काम सुरू झाले असून दोन गावांमध्ये योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे.

तालुक्यातील घारापुरी आणि रानसई या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा अद्याप डिपीआर बनणे बाकी असल्याने त्या योजनांचे अंदाज पत्रक बनविण्यात आले नाही. घारापुरी बेटावरील तीन गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 17 कोटी 60 लाख रूपयांची योजना प्रस्तावित आहे. तर उरण पुर्व भागातील पुनाडे 10 गाव पाणी पुरवठा योजना आणि चाणजे ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना या महाराष्ट जीवन प्राधिकरणाकडे असल्याने तेथे यो योजना लागू झाल्या नाहीत.

या बाबत माहिती देताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता संजय वेंगुर्लेकर आणि पनवेल विभागाचे कनिष्ठ अभियंता भातेष चव्हाण यांनी सांगितले की उरण तालुक्यात 20 ग्रामपंचायतीमध्ये जल जीवन मिशन योजना राबविण्यात येणार असून काही ठिकाणी या योजनेतील कामे सुरू झाली आहेत. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील नागरीकांना घरोघरी नळा मार्फत पाणी पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

प्रस्तावित योजना
चिर्ले आदिवासी नल पाणी पुरवठा योजने करीता 24.37 लाख, वेश्‍वी आदीवासी 18.06 लाख, विंधणे एक कोटी 41 लाख 28 हजार, केगाव एक कोटी 77 लाख 65 हजार, नविन शेवा 47.23 लाख, बोकडविरा 21.73 लाख, चिरनेर करीता एक कोटी 98 लाख 67 हजार, फुंडे 23.62 लाख, जासई 51.36 लाख, कळंबुसरे 46.84 लाख, करळ 23.28 लाख, नवघर 93.64 लाख, बांधपाडा एक कोटी 85 लाख 72 हजार, दिघोडे 56 लाख, जसखार 51.83 लाख, म्हातवली 21.19 लाख, मोठी जूई 21.94 लाख, नागाव पाणी पुरवठा योजने करता 54.44 लाख आणि पागोटे 34.12 लाख असा एकूण 12 कोटी 92 लाख 97 हजार रूपयांच्या योजना तयार करण्यात आल्या असून नविन शेवा, चिर्ले, वेश्‍वी आणि फुंडे या गावांमध्ये या योजनेची कामे सुरू झाली आहेत.

Exit mobile version