ग्रामीण भागात पाणीटंचाई; खोपटे येथील काम संथ गतीने
। उरण । वार्ताहर ।
हर घर जल या संकल्पनेखाली पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले होते, मात्र उरण तालुक्यातील खोपटे गावामध्ये मात्र हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने खोपटे गावात पाणीटंचाई सुरू आहे. मुख्य पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खोपटे ग्रामस्थ करीत असून, गावातील युवकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन सदरील कामासाठी तक्रार केली आहे. खोपटे गावात जलजीवन मिशनअंतर्गत हर घर जल या योजनेच्या कामात कंत्राटदराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालढकल सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत खोपटे ते चिरनेर गावापर्यंत अपूर्ण असलेल्या पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खोपटे गावातील ग्रामस्थ करत आहेत. हे काम पूर्ण न झाल्यामुळे खोपटे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. सातपाड्यांनी वसलेल्या या गावात जवळपास एक दिवसाआड फक्त एका तासासाठी पाणी येत आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे, असे महिलांकडून बोलले जात आहे. यासंसदर्भात खोपटा गावातील युवक गोरख ठाकूर, रोहित भगत, वैभव घरत या युवकांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची अलिबाग येथे भेट घेतली. त्यांनी उरणमधील पाणीपुरवठा अधिकारी रुपाली म्हात्रे यांना काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संबंधित योजनेसाठी पूर्वी 11 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता, मात्र हळूहळू होणार्या कामांमुळे या योजनेला आणखी तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जलजीवन मिशन योजनेची कामे ही उरण तालुकातील पूर्व विभागातील सर्वच गावांमध्ये धीम्या गतीने होत आहेत. त्याचा परिणाम उरण तालुक्यातील गोवठणे, आवरे, पाले, खोपटे या गावांना कमी पाणीपुरवठा होत आहे.
जलजीवन ही सुधारित योजना झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. त्याचप्रमाणे ही योजना राबविताना कंत्राटदारासह गावातील काही जागांच्या अडचणी होत्या. त्यामुळे ही कामे हळूहळू होत होती. कंत्राटदाराने कामे करण्यासाठी उशीर केल्याने त्यालादेखील दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मार्च 2025 पर्यंत ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
– प्रशांत पांढरपट्टे, उपअभियंता, एमजीपीजी