। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काचे वृत्तपत्र असलेल्या कृषीवलमार्फत वेगवेगळ्या प्रश्नांवर बातमीच्या रुपात आवाज उठविला आहे. या कृषीवलच्यावतीने यावर्षीदेखील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन गुरूवारी (दि.16) अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले आहे. वेगवेगळ्या मालिकांमधील सिनेतारका या समारंभाचे आकर्षण ठरणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कृषीवल परिवाराकडून जपण्यात आली आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ग्रामीण व शहरी भागातून येणार्या महिलांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा, यासाठी व्यवस्थापन करण्यात आले आहे. सुसज्ज असा मंडप उभारला जाणार आहे. या सोहळ्यामध्ये पीएनपी एज्युकेशन, पटेल ज्वेलर्स, मीना खाकी पावडर, सुहाना मसाले, रामबंधू आचार, सोसायटी चहापावडर, टॉयेटो कार अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी असणार आहे. महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजल्या जाणार्या हळदीकुंकूचा समारंभ गुरुवारी सायंकाळी चार ते सात यावेळेत होणार आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्या तथा ज्ञानदा रामतीर्थकर, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील मंजिरी तथा पुजा बिरारी, ‘साधी माणसं’ या मालिकेतील मीरा तथा शिवानी बावनकर या तीन अभिनेत्रींबरोबरच सत्या तथा आकाश नलावडे या अभिनेत्याची उपस्थिती राहणार आहे. या हळदीकुंकू समारंभाला सिनेतारकांचे मोठे आकर्षण राहणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
लकी ड्रॉ बक्षिसांची संधी
कृषीवल आयोजित हळदीकुंकू समारंभाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवून हा सोहळा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये या सोहळ्यातील एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, लकी ड्रॉ स्टॉल आहे. या स्ट्रॉलमधील असलेल्या खोक्यामध्ये 20 रुपयांचे कुपन टाकण्याची व्यवस्था केली आहे. वीस रुपयांत भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. 16 जानेवारीला हळदीकुंकू समारंभात निकाल जाहीर केला जाईल. 17 जानेवारीला कृषीवलमध्ये विजेत्यांची नावे प्रसिद्ध केली जातील. यातील विजेत्यांना मिक्सर, गॅस शेगडी, शुद्ध पाण्याचे आक्वागार्डचे भांडे व जेवण गरम करण्याचे ओव्हन आदी आकर्षित बक्षिसे दिली जाणार आहेत.