झुंझार क्रिकेट स्पर्धेत उरण विजेता

| पोयनाड | वार्ताहर |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.अँड. शिरीष पाटील स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील ए ग्रुप मधील साखळी फेरीतील उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन संघांने स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघावर विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत स्पोर्टी-गो संघांनी 39.4 षटकामध्ये सर्व गडी गमावत 205 धावा नोंदवल्या, अक्षत जेना यांनी सर्वाधिक 60 धावा तर श्रेयस पवार 37 आणि हर्ष पाटील यांनी 34 धावांचे बहुमूल्य योगदान संघाला दिले. उरण आर्यन निकाळजे यांनी 4 फलंदाज बाद केले तर अरमान शेख, तनिष पुजारी, रिषभ ठाकूर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रतिउत्तर देतांना उरण संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आर्यन निकाळजे यांनी धुवाधार फलंदाजी करत 71 धावा काढल्या. त्याला तनिष पुजारी 27 व अरमान शेख यांनी 25 धावा करून साथ दिली. मधल्या फळीतील बाद झाल्याच्या नंतर सामना अटीतटीचा झाला. देवेश गुरव यांनी शेवट पर्यंत एक बाजू सांभाळत नाबाद 37 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. उरण संघांनी सामना 1 गडी राखून जिंकला. स्पोर्टी-गो संघाकडून दिव्यांश चौधरी, अक्षत जेना, श्रेयस पवार यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा आर्यन निकाळजे याला सामनावीर, अक्षत जेना प्रतिस्पर्धी खेळाडू, देवेश गुरव, श्रेयस पवार इमर्जिंग प्लेअर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सानुराग शर्मा यांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रशांत माने, संदिप जोशी, सुरेश पटेल, प्रविण ठाकूर, किशोर गोसावी, विकास देवकर, संकेश ढोळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version