उरणकरांची सुरक्षा रामभरोसे

निकामी ठरलेत सीसीटीव्ही कॅमेरे

| उरण | वार्ताहर |

उरण परिसरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही महिन्यांपासून बंद पडले आहेत. निकामी ठरलेल्या सीसीटीव्हीमुळे उरणकरांची सुरक्षा रामभरोसे उरली आहे. विविध शासकीय विभागांनी उरणमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची दिलेली आश्‍वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

जेएनपीए अंतर्गत असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी सहा बंदरे, त्यावर आधारित उभारण्यात आलेल्या शेकडो कंटेनर यार्ड, सीएफएल, कंपन्यांमुळे उरण परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगती पथावर आहे. भविष्यात किंवा एक दोन वर्षांत या बंदरातून एक कोटी कंटेनर मालाची चढउतार होणार आहे. त्यामुळे उरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यानंतर आता मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणार्‍या अटल सेतू आणि रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई-उरण अंतर तर अवघ्या 60 मिनिटांवर आले आहे. या वाढत्या औद्यौगिकीकरणामुळे लोकसंख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्येदेखील वाढ झाली आहे. यामध्ये हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरतात. मात्र, उरण परिसरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून निकामी अथवा बंद पडलेले आहेत. तर रेल्वे स्थानक परिसर आणि काही मोक्याच्या ठिकाणी अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

उरण शहर आणि परिसरात सुमारे 85 सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव पोलीसांकडून देण्यात आला होता. यासाठी ओएनजीसी आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याचे नवनियुक्त उरण वपोनि जितेंद्र मिसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते. तर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उरण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी माहिती देताना सांगितले होते. तर उरणमधील हत्या, महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना, बदलापूर येथील शालेय चिमुरड्यांवर झालेल्या संतापजनक घटनांनंतर अनेक राजकीय पुढारी, विविध सामाजिक संस्था यांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. मात्र सत्ताधारी महत्वाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version