उरणकरांची सुरक्षा रामभरोसे

वीज जोडणी अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण परिसरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेले 105 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी फक्त 30 कॅमेरेच सुरू आहेत. वीजेच्या जोडणी अभावी 75 सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही मागील काही महिन्यांपासून बंद पडले आहेत. ऐन सणासुदीमध्येच जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांच्या विविध तपास कामांसाठी उपयुक्त ठरणारा तिसरा डोळाच निकामी ठरला आहे. बंद पडलेल्या सीसीटीव्हीमुळे मात्र उरणकरांची सुरक्षा रामभरोसे उरली आहे.

जेएनपीए अंतर्गत असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी पाच बंदरे, त्यावर आधारित उभारण्यात आलेल्या शेकडो कंटेनर यार्ड, सीएफएल, कंपन्यांमुळे उरण परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगती पथावर आहे. येत्या दोन वर्षांत या बंदरातून एक कोटी कंटेनर मालाची चढउतार होणार आहे. त्यामुळे उरण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यानंतर आता मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई -उरण अंतर तर अवघ्या 60 मिनिटांवर आले आहे. या वाढत्या औद्यौगिकीकरणामुळे लोकसंख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली आहे. यामध्ये हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरतात. मात्र, उरण परिसरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून निकामी अथवा बंद पडलेले आहेत. तर रेल्वे स्थानक परिसर आणि काही मोक्याच्या ठिकाणी अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मागील काही महिन्यांपासून उरण परिसरात हत्या, चोऱ्या आणि इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. मात्र, पोलिसांसाठी महत्वाचा दुवा ठरणारा तिसरा डोळाच निकामी ठरल्याने उरणची सुरक्षा सध्या रामभरोसे उरली आहे. यामुळे पोलिसांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे उरण परिसरातही सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांसाठी महत्वाचा दुवा ठरणारा तिसरा डोळाच निकामी ठरल्याने पोलिसांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उरण परिसरातील अनेक मोक्याच्या व आवश्यक ठिकाणी 105 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला फक्त 30 सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू आहेत.


वीजपुरवठ्या अभावी बसविण्यात आलेले 75 सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बंद आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यासाठी येथील स्थानिक पातळीवर ओएनजीसी, गृहविभाग, उरण नगरपरिषद आणि संबंधित शासकीय विभागाकडे संपर्क साधण्यात आला आहे.

-हनीफ मुलाणी
उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Exit mobile version