। उरण । वार्ताहर ।
सिडकोच्या माध्यमातून उरणमध्ये द्रोणागिरी नोड उभे रहात आहे. या नोडमध्ये उभ्या राहणार्या इमारतींना वापरण्यात येणारे मटेरियल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होत आहे. याची बोकडविरा येथील सिडको अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता बांधकाम विभागाशी सिडकोचा सबंध नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तरी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करून न्यायालयात दाद मागितली जाण्याच्या तयारीत सामाजिक संघटना असल्याची समजते.
उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना सिडकोने येथे द्रोणागिरी नोडची निर्मिती केली आहे. अनेक बिल्डरांनी याठिकाणी भूखंड घेऊन इमारती उभ्या करण्याचा सपाटा लावला आहे. बिल्डरांना सिडकोकडून एनओसी दिल्यानंतर बांधकाम सुरू केले जाते. परंतु सदर बांधकामांना दिलेल्या परवानगी व नियमानुसार काम न करता सर्रासपणे त्याचे उल्लंघन करून बांधकामांसाठी सर्रासपणे खरापाणी व ग्रीटचा वापर केला जात आहे. त्यामुळे इमारतीसाठी वापरण्यात येणारे सर्वच मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते.
विशेष म्हणजे हा सर्व भाग दलदलीचा असल्याने इमारत उभी करताना कॉलम उभारताना जी खोली हवी ती न करता वरवर खोदून कॉलम उभे करून इमारत उभी करून आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. यावर सर्व नियंत्रण सिडकोचे अपेक्षित असतानाही तसे होताना दिसत नाही. तसेच इमारत उभी रहात असताना कोणताही अधिकारी देखरेखीसाठी नसतो. त्यामुळे भविष्यात या उभ्या राहिलेल्या इमारती ज्यावेळी वास्तव्य व रेल्वे सुरु होईल त्यावेळी नक्कीच त्यांना धोका पोहचू शकतो.
आजच्या घडीला काही इमारतींची अवस्था त्याकडे झुकताना दिसत आहे. त्यामुळे द्रोणागिरी नोडमध्ये उभ्या रहस्त असलेल्या सर्व इमारतीचे स्ट्रक्चल ऑडीट करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा करून थेट न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागण्याची तयारी उरणमधील सामाजिक संघटनेनी सुरू केली आहे.