आरटीओ विरुद्ध स्थानिकांची नाराजी
| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे आरटीओ कार्यालय पेण येथे आहे. हे कार्यालय कित्येक वर्षे भाड्याच्या इमारतीमध्ये असून, पाच वर्षांपूर्वी जिते येथे या कार्यालयासाठी व ट्रेनिंग ट्रॅकसाठी जागा ताब्यात घेण्यात आली. मात्र, आजही कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. जिते येथे ट्रेनिंग ट्रॅकचे काम काही प्रमाणात झाले आहे. मालवाहतूक गाड्यांची पासिंगची कामे ही जिते येथील ट्रेनिंग ट्रॅकवर होतात. परंतु टू व्हिलर, थ्रि व्हिलर व छोट्या गाड्यांसाठी जिते येथे नेले जात नाही, तर खोपोली बायपास रस्त्याचा वापर केला जातो. ज्या वेळेला ही ट्रेनिंग सुरू असते, त्यावेळेला खोपोली बायपासच्या रस्त्याची एक बाजू रिलायन्स ऑफिसपासून ते धावट्याच्या स्पेन पाईनपर्यंत बंद केली जाते. त्या वेळेला या रस्त्यावरून वाहतूकही एकाच लाईनने सुरू असते. अशा वेळेला रस्ता डिव्हाईड झालेला नवख्या वाहन चालकांना समजत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, अशी नाराजी कृषीवलशी बोलताना मा. सरपंच आंबेघर यांनी व्यक्त केली.
त्यांनी पुढे हे ही सांगितले की, ट्रेनिंगचे काम पूर्ण झाल्यावर अडवलेला रस्ता मोकळा करणे गरजेचे असते, परंतु, रस्ता मोकळा केला जात नाही. वारंवार याबाबत आर.टी.ओ. कार्यालयाला तोंडी सूचना दिल्या आहेत. याबाबत आर.टी.ओ. अधिकारी महेश देवकाते यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्यावेळी ट्रेनिंग सुरू असते, त्या वेळेला रस्त्याची एक बाजू ताब्यात घेतली जाते. परंतु, काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची अडवलेली बाजू मोकळी केली जाते.