पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे आवाहन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. या माध्यमातून हिंसा पसरविणार्या पोस्ट करु नये. सोशल मीडियावर वॉच ठेवण्याचे काम सायबर पोलिसांकडून करण्यात येत असून, त्याचा वापर जपून करा, असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.
या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी लोक ओळखी-अनोळखी लोकांशी जोडलेले आहे. दररोज काहीना काही शेअर करत असतात. मात्र, अनेकदा आपण अशी माहिती शेअर करतो, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हीदेखील या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल, तर विना विचार करता काहीही शेअर करू नका. कारण, सध्या सोशल मीडियावर गुंडागर्दी वाढल्याचे दिसत आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंसा पसरवणार्या पोस्ट शेअर करू नये. हिंसा पसरण्याच्या उद्देशाने पोस्ट शेअर करणार्या यूजर्सला प्लॅट फॉर्मकडून ब्लॉक केले जाते. सोबतच कंपन्या आयपी अॅड्रेस पोलिसांना पाठवतात व अशा यूजर्सवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता सोशल मीडिया जरा जपूनच वापरा, असा सल्ला पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे.
तलवारीने केक कापण्याची फॅशन
तलवारीने केक कापण्याची फॅशन प्रचंड रूढ झाली आहे. युवकांच्या टोळ्यांकडून तलवारीने केक कापण्याची फॅशन ज्या प्रकारे वाढली, त्याच प्रमाणात पोलीस कारवायाही वाढल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करताच ती तलवार लाकडी तसेच प्लास्टिकची असल्याचा खुलासा करण्यात येतो. यावरून पोलीस अशा सोशल मीडियावरील गुंडांवर कारवाईसाठी तत्पर असल्याची माहिती आहे.
लाईक करणारेही येणार अडचणीत
सोशल मीडियाच्या या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होणे, गॉसिप होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही. त्यातून अफवा पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात.
सोशल मीडियावर वॉच ठेवण्याचे काम सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुणीही वाढदिवस साजरा करताना तलवार, गुप्ती, चाकू किंवा तशा प्रकारचे धारदार शस्त्र वापरल्यास तातडीने कारवाइ करण्यात येईल. तर अशा गुंडांचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक
सोशल मीडियाचा वापर जपून करा
