ठाण्यात जीटीसी चषकावर युवी स्पोर्टस्‌‍‍ अलिबागचा कब्जा

चित्रलेखा पाटील पुरस्कृत संघाची दमदार कामगिरी

| अलिबाग | संतोष राऊळ |

ठाण्याच्या क्रिकेट मैदानावर रायगडच्या युवी स्पोर्टस्‌‍‍ अलिबाग एनएम संघाने आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करत जीटीसी ठाणे चषकाच्या पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली. ट्विशा स्पोर्ट्स आयोजित या दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. मात्र, अंतिम सामन्यात क्लिअर कट स्ट्रायकर्सला धूळ चारत चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवी स्पोर्टस्‌‍‍ अलिबाग एनएम रायगड संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. ठाणे जिल्ह्यात रायगडचा झेंडा उंचावणाऱ्या या संघाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दि. 4 ते 6 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना डोंबिवली येथील निलजे क्रिकेट मैदानावर रंगला. युवी स्पोर्टस्‌‍‍ अलिबाग एनएम रायगड आणि क्लिअर कट स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात युवी स्पोर्टस्‌‍‍ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर कबीर सिंग आणि किरण पवार यांनी पहिल्याच षटकात चौकार-षटकारांची आतषबाजी करत तब्बल 24 धावा कुटल्या आणि संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. तिसऱ्या षटकात ओम पाटीलने किरण पवारला 10 चेंडूंत 16 धावांवर पायचित केले. त्यानंतर कबीर सिंगला साथ देण्यासाठी आलेल्या अक्षय पवारने षटकाराने सुरुवात केली; मात्र, सूर्याच्या गोलंदाजीवर तो 3 चेंडूंत 10 धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ ऋतिक पाटीलही सूर्याच्या गोलंदाजीवर 3 चेंडूंत 6 धावा करून झेलबाद झाला. अमित पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर योगेश पवारच्या साथीने कबीर सिंगने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. शेवटच्या षटकात चौकार-षटकारांची आतषबाजी करत युवी स्पोर्टस्‌‍‍ने 5 षटकांत 3 बाद 81 धावांचा डोंगर उभा केला. कबीर सिंगने अवघ्या 13 चेंडूंत 38 धावा केल्या, तर योगेश पवार 2 चेंडूंत 8 धावा करून नाबाद राहिला.

82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी क्लिअर कट स्ट्रायकर्सकडून नागेश वाडेकर आणि सूरज केने सलामीला उतरले. युवी स्पोर्टस्‌‍‍चा आर्यन भोईर याने पहिल्याच षटकात अवघ्या 8 धावा देत प्रतिस्पर्ध्यांना रोखले. मयूर वाघमारे यानेही आपल्या षटकात फलंदाजांना जखडून ठेवले. त्याच्या षटकात सूरज केनेचा झेल सुटला; मात्र, आर्यन भोईरने तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कमाल दाखवत कबीर सिंगच्या हातून सूरज केनेला 28 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कृष्णा पवार मैदानात उतरला. दोन षटकांत 44 धावांची गरज असताना करण पाटीलने चौथे षटक टाकले. त्याच्या तिसऱ्याच चेंडूवर नागेश वाडेकर 9 धावांवर धावबाद झाला. त्यापाठोपाठ करण पाटीलने ऋतिक पाटीलच्या हातून कृष्णा पवारला 7 धावांवर झेलबाद करत स्ट्रायकर्सला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे युवी स्पोर्टस्‌‍‍ने सामन्यावरील पकड मजबूत केली.

शेवटच्या षटकात स्ट्रायकर्सला विजयासाठी 36 धावांची गरज होती. प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची गरज असताना मुन्ना शेखने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि स्ट्रायकर्सच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. मुन्ना शेखने 16, तर अश्रफ खानने 6 धावा करून नाबाद राहत चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र, स्ट्रायकर्सचा डाव 5 षटकांत 3 बाद 67 धावांवरच थांबला. त्यामुळे क्लिअर कट स्ट्रायकर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि जीटीसी ठाणे चषकाच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद युवी स्पोर्टस्‌‍‍ अलिबाग एनएम रायगडने पटकावले. या स्पर्धेत किरण पवार याला मालिकावीर, तर कबीर सिंग याला उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळाला. संघाच्या या शानदार यशाबद्दल सर्व खेळाडूंसह संघमालक चित्रलेखा पाटील, संघ व्यवस्थापक साई पाटील आणि कर्णधार अंगद पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version