। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद युवी स्पोर्ट्स, अलिबाग संघाने पटकावले. प्रफुल्ल अॅण्ड निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ उपविजेता ठरला.
अलिबाग येथील क्रीडाभवन मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत युवी स्पोर्ट्स, अलिबाग संघाने प्रफुल्ल अॅण्ड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने तृतीय तर एबी ग्रुप अलिबाग संघाचे चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून युवी स्पोर्ट्स, अलिबागचा निखील पाटील याला गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रफुल्ल अॅण्ड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा अक्षय पाटील यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून एबी ग्रुप अलिबागचा ओमकार पाटील याची निवड करण्यात आली.
अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अॅड.प्रवीण ठाकूर, युवराज पाटील, महेश शिंदे, अशोक प्रधान, महेश पाटील, कपिल अनुभवणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला दोन लाख रुपये, चषक व टीव्ही, उपविजेत्या संघास एक लाख रुपये, चषक व टीव्ही बक्षीस देण्यात आले. तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये चषक व टीव्ही बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूस दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल अशी वैयक्तिक बक्षीसे देण्यात आली.