जिल्हा रुग्णालयाचे ‘आरोग्य’ ऑक्सिजनवर

डॉक्टरांची महत्त्वपूर्ण पदे रिक्त; कार्यरत डॉक्टरांवर प्रचंड ताण
भारत रांजणकर । अलिबाग

रिक्त पदांमुळे ताण येत असल्याने आरोग्य व्यवस्था पुरविण्यास आधीच अकार्यक्षम ठरणार्‍या जिल्हा रुग्णालयातील डॉ. पडोळे आणि डॉ. तांबाळे या दोन महत्त्वपूर्ण डॉक्टरांची अन्यत्र बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयाची उरलीसुरली आरोग्य व्यवस्थादेखील अक्षरशः ऑक्सिजनवर आली आहे. त्यामुळे या रुग्णालयावर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांविरोधात आवाज उठवला. मात्र, सत्तेत सहभागी असणारे जिल्ह्यात सहा-सहा आमदार असतानाही त्यांना सत्ताकारणात स्वारस्य असल्याने या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पध्दतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या ही सुमारे 500 च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते.

अपुर्‍या मनुष्यबळावर रुग्णालयाचा गाडा दररोज ओढण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. एकाच व्यक्तीकडे पदभार देण्यात आल्याने त्यांनाही काम करणे मुश्कील झाले आहे. शिवाय, त्यांच्याकडून अपेक्षित रिझल्टही मिळत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. अपघात विभागातील डॉक्टरलाच अतिदक्षता विभाग सांभाळावा लागत आहे. कमी डॉक्टरांच्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या संसर्गापूर्वीपासून आणि कोरोना काळात जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेची चांगल्या प्रकारे सेवा बजावलेल्या डॉ. विक्रमजीत पडोळे आणि डॉ. राजीव तांबाळे या दोन एमडी डॉक्टरांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. त्यात डॉ. पडोळे यांच्याकडे तर मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार असतानाही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा बजावली. त्यामुळे रुग्णांसाठी हे दोन्ही डॉक्टर देवदूत ठरत होते. मात्र, अलीकडेच या दोन्ही डॉक्टरांची अन्यत्र बदली करण्यात आल्याने रुग्ण तसेच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

आधीच रिक्त असलेली पदे भरण्याऐवजी, आहेत त्या डॉक्टरांच्या जागादेखील रिक्त करुन अन्यत्र बदली करण्यात येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल फुटाणे हेदेखील सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता फक्त कंत्राटी डॉक्टरांच्या खांद्यावरच संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेची भिस्त आहे. त्यामुळे जर जिल्ह्यातील रुग्णांची काळजी असेलच तर तातडीने ही रिक्त पदे भरुन आरोग्य व्यवस्थेला रुग्णशय्येवरुन उठविण्याची गरज आहे.यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

रिक्त पदे
सर्जन, भूलतज्ज्ञ, त्वचा रोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ अशा वर्ग 1च्या 80 टक्के डॉक्टरांची पदं तसेच बाह्यरुग्ण संपर्क, निवासी वैद्यकीय अधिकारी अशी महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत.

जिल्हा रुग्णालयच आजारी- पंडित पाटील
जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत, हे जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाकडे कोणालाच लक्ष द्यायला हे वेळ नाही, याचे वाईट वाटते. असलेल्या कर्मचार्‍यांचे पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. जीएसटीच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम जाते कुठे, असा प्रश्‍न शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. असे असेल तर विद्यमान सरकार आणि आधीचे सरकार यात फरक तो काय? गोविंदाला द्यायला दहा लाख रुपये शासनाकडे आहेत. मात्र कर्मचार्‍यांचे पगार करायला पैसा नाही. जर मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतील आणि आहेत त्यांचे पगार दिले जात नसतील, तर रुग्णालयाला कुलूप लावा, अशी उपरोधिक मागणीदेखील पंडित पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने रिक्त पदे तातडीने भरुन कर्मचार्‍यांचे थकलेले पगार करण्यासाठी पैशांची तरतूद करण्याची सूचनादेखील त्यांनी केली.

Exit mobile version