वाहन चालकांची कसरत
हमरापूर | वार्ताहर|
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम असून, पेण-वडखळ व वडखळ-नागोठणेपर्यंत अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याचा फटका प्रवासी, कामगार व विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांचे अतोनात हाल होत आहेत.
वडखळ ते नागोठणे या रस्त्याची पुरती दैना झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वडखळपासून नागोठणेपर्यंत जाण्यासाठी किमान दीड तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे सर्वच जण बेजार झाले असून, जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आता महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु झाले आहे. मात्र, वडखळ ते नागोठणेपासून पुढील रस्त्यावर खड्डेच पडले असून, या खड्ड्यांमधून गाडी चालवताना वाहन चालकाला बरीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय राजकीय नेते व पदाधिकारी तसेच प्रशासनाने महामार्गाच्या या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.