| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकत 33 हजार 300 रुपयांचा गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पेण तालुक्यातील डोलवी परिसरात वडखळ पोलिसांनी केली. या कारवाईमुळे अवैध गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोलवी येथील महामार्गालगत असलेल्या एका चिकन विक्रेत्याच्या दुकानाजवळ गांजाची अवैधरित्या तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती वडखळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार दिनेश ढेणे, प्रशांत देसाई, रुपेश कोंडे तसेच पोलीस शिपाई आकाश कुथे, रामनाथ ठाकूर आणि बांगर यांचा समावेश होता.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून गांजाचा साठा जप्त करण्यात आला. राजा जुमराती मिया अली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहार राज्यातील आहे आणि सध्या डोलवी येथे वास्तव्यास आहे. प्राथमिक तपासात तो गेल्या काही महिन्यांपासून गांजाची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार कुंडलिक बांगर यांनी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे करत आहेत.
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
