व्हॅलेंटाईन सप्ताहानिमित्त तरुणाईचा उत्साह शिगेला

बाजारात गुलाबाच्या फुलांना वाढती मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रेमासाठी असा कोणता दिवस नसून, येणारा प्रत्येक दिवस प्रेमाचाच असतो. परंतु, व्हॅलेंटाईन सप्ताहाचे महत्त्व आणि आकर्षण वेगळेच. आपल्या जोडीदाराला फूल दिल्यावर तर यात आणखीनच बहार येते. हाच फूल देण्याचा दिवस म्हणजे रोझ डे. व्हॅलेंटाईन दिवसाची सुरुवात याच दिवसाने होते. या सप्ताहातील पहिला दिवस बुधवारी आहे. वर्षभरापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवशी व्यक्त होणार असून, त्यामुळे नात्यातील सुगंध नव्याने दरवळेल, अशी आशा प्रेमीजनांना आहे. म्हणूनच या आठवड्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, उत्साहसुद्धा शिगेला पोहोचला आहे.

प्रेमीयुगुलांचा आवडता सत्पाह म्हणजे व्हॅलेंटाईन. या सप्ताहातील सात दिवस तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या प्रेमाची आठवण म्हणून अनेक जण फूल देतात. फुले मन जोडण्याचे काम करतात. या फुलांबरोबरच ‌‘ती’चा किंवा ‌‘त्याचा’ चेहरा फुलासारखाच खुलतो, त्यामुळेच तर गुलाबाच्या फुलांना जास्त मागणी असते. या सप्ताहाची सुरुवात ‌‘रोझ डे’ने होत आहे. प्रेमाला आणि ते व्यक्त करण्याला वयाचं बंधन नसते. त्यामुळे पुढील सात दिवस सुरू राहण्ााऱ्या या उत्साहात तरुणाईबरोबर प्रौढही सामील झाल्याचं चित्र दिसले तर नवल वाटायला नको. या सप्ताहात लाल गुलाबाला अधिक मागणी असते. तरुणाईसह एकंदर या आठवड्यातील फुलांची वाढती मागणी पाहता, फूलविक्रेत्यांकडूनही गुलाबाची जास्त आवक करण्यात येत असते, असे अलिबागमधील फूलविक्रेत्या सारिका सुतार यांनी सांगितले. फुलाची किंमत वीस रूपये, बंडलची किंमत 400 रुपये असून, प्रत्येक बंडलमध्ये वीस गुलाब, गुलाबाच्या बुकेची किंमत दीडशे रुपयांपासून, साडेतीनशे, पाचशे रुपये अशी आहे, असेही सुतार म्हणाल्या.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुलाबाच्या फुलांना असलेल्या मागणीमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. अलिबागमध्ये हजारोंच्या संख्येने गुलाबांची, विशेषतः लाल गुलाबाची विक्री होत असून, प्रतिगुलाब 20 रुपयांना विक्री करण्यात येते. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीपासूनच मोठ्या प्रमाणात गुलाब फुलांची विक्री होत असते.

सारिका सुतार, फूलविक्रेत्या, अलिबाग
Exit mobile version