काँग्रेसला वंचितचा सात जागांवर पाठिंबा

| मुंबई | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक 21 जागा लढवणार आहे. तर काँग्रेस 17 आणि शरद पवार गट 10 जागा लढवणार आहेत. या जागा वाटपात समाजवादी पार्टी, माकप, शेकाप आणि इतर मित्र पक्षांना एकही जागा देण्यात आलेली नाही. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही मतदारसंघात महाविकास आघाडी पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिला. तर शरद पवार गटाला बारामतीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी अकोल्यातून उमेदवार देणार नाही अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसने अकोल्यातून उमेदवार दिला. त्यानंतर शरद पवार यांनी अजून वेळ गेलेली नाही. त्याबाबत चर्चा होईल, असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा देण्यासाठी शरद पवार काँग्रेसचं मन वळवतील असं सांगितलं जात होतं. पण आज झालेल्या जागा वाटपात काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे अकोल्यात महाविकास आघाडी आंबेडकरांना टक्कर देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Exit mobile version