वंजारवाडी पूल धोकादायक स्थितीत

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची स्थानिकांची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून नाशिक-शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली-वाकण असा राष्ट्रीय महामार्ग जात असून या महामार्गावरून सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरु आहे. मात्र या रस्त्यावरील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे असलेला पूल धोकादायक समजला जात आहे. दरम्यान, या पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग 548 अ हा कर्जत तालुक्यातून जातो. या रस्त्याचे कर्जत तालुक्यात रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून सुरु आहे. या रस्त्यावर वंजारवाडी येथे पेज नदीवर पूल असून त्यांची निर्मिती शासनाने 1970च्या दशकात केली आहे. 50 हुन अधिक वर्षे वयोमान झालेल्या या पुलावर नेहमी पडणारे खड्डे यामुळे वाहनचालक यांच्यासाठी हा पूल धोकादायक वाटत आहे. पुलाच्या आजूबाजूला 100 मीटरचा रस्ता वगळता अन्य रस्ता काँक्रीटचा बनला आहे. मात्र पुलाबाबत आणि त्या पुलावरील खड्ड्यांबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम हाती घेत नसल्याचे दिसून येत आहे. पुलावर असंख्य खड्डे आणि अनेक वर्षे दुरुस्ती न केलेला पूल यामुळे हा पूल अधिक धोकादायक बनला आहे.


दुसरीकडे स्थानिक रहिवासी कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दोनवेळा रस्त्याच्या आणि पुलाच्या नादुरुस्तीबद्दल आवाज उठवला होता. मात्र या भागात कार्यालय नसलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळत नाही.तर आदिवासी भागातील कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे सदर पुलाच्या नादुरुस्तीबद्दल आक्रमक भूमिका घेऊन देखील एमएसआरडीसी गप्प आहे.

Exit mobile version