सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचा ढिसाळ कारभार
| महाड | वार्ताहर |
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंध असे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. सन 2021 च्या पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षीदेखील डेंजर झोनमध्ये असून, तब्बल चार वर्षांनी घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. या अजब कारभारावर स्थानिक रहिवासी, पर्यटक व मालवाहतूकदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणार्या महाबळेश्वर आणि वरंधा भोर घाटाची सन 2021 मधील अतिवृष्टीमध्ये मोठी हानी झाली होती. दोन्ही घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने पूर्णपणे वाहतुकीस बंद झाले होते. संपूर्ण घाटात दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. या भेगा रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकामाने काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती. वरंधा घाट हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केला आहे, तर महाबळेश्वर घाटात महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेल्या मार्गाची आजदेखील दुरवस्था आहे. ठिकठिकाणी कामे सुरु असून, मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणार्या पर्यटकांच्या व स्थानिक माल वाहतूकदारांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत आहे.
उन्हाळ्यात येणार्या पर्यटकांमुळे घाट मार्ग दुरुस्त करता आला नसल्याचे अजब उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. या घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दगडी आणि माती अद्याप काही ठिकाणी हटवण्यात आलेल्या नाहीत. महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर काम सुरु केल्याचे दाखवले आहे. यामध्ये प्रतापगडपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण सरंक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई आदींचा समावेश आहे. अवाढव्य स्वरूपात आलेल्या मातीच्या आणि दगडी दरडी पाहता सद्यःस्थितीत बांधत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती किती तग धरतील, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. महाबळेश्वर घाटात सन 2021 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले होते. सातारा जिल्ह्याच्या प्रतापगडच्या हद्दीपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पुढील वर्षी या या राष्ट्राचे काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वरचे उपविभागीय अभियंता अजित देशपांडे यांना विचारले असता त्यांनी याबाबत या गोष्टीला दुजोरा दिला.
कामे संथ गतीने सुरू सन 2024 चा पावसाळा सुरू होण्यास फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना ही कामे अद्याप संथ गतीने चालू आहेत. महाबळेश्वर घाटातील प्रतापगडपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण जरी पूर्ण झाले असले, तरी रस्त्यावरील 2021 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या नदी नाल्यांवरील मोठ्या व लहान पुलांचे प्रमाणावर नुकसान होऊन क्षतिग्रस्त झाले होते त्यांची कामे अत्यंत धीम्या गतीने चालू आहेत. मागील तीन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर यांनी डोळेझाक करून या कामांच्या पूर्णत्वाकडे का गप्प बसले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.