माणगावतर्फे वरेडी पाणी योजना कुर्मगतीने

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी नळपाणी योजनेचे काम गेली वर्षभर संथगतीने सुरू आहे. या नळपाणी योजनेचे जलकुंभ कामाची चौकशी गेली तीन महिने सुरू आहे. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनेचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेण्यात येत नाही.

माणगाव ग्रामपंचायतीमधील माणगाव तर्फे वरेडी नळपाणी योजनेचे काम 2022 रोजी मंजूर करण्यात आले आहे. कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील पुलाच्या बाजूला उद्भव विहीर बांधून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशनमधून या नळपाणी योजनेसाठी 19 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यात नदीवर उद्भव विहीर आणि माणगावमध्ये जलकुंभ तसेच पाणी वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. या योजनेच्या उद्भव विहिरीचे काम गेल्या अनेक महिने अर्धवट अवस्थेत आहे. त्याचवेळी पाणी वितरण करणार्‍या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्या जोडण्यात आल्या नाहीत. नदीवरील पंप हाऊसचे काम अनेक महिने अपूर्ण अवस्थेत आहे. या योजनेचे काम करणार्‍या ठेकेदाराकडून नळपाणी योजनेकडे दुर्लक्ष होत आहे काय? असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

या नळपाणी योजनेचा पाणी साठवण टाकी जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशी तक्रार बेकरे गावातील ग्रामस्थ आकाश कराळे यांनी केली असून जलकुंभ साठवण टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कर्जत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असून त्यामुळे नळपाणी योजनेचे काम बंद आहे. या नळपाणी योजनेमधून गेल्या दीड वर्षात हर घर जल ही संकल्पना यशस्वी झाली नाही. याबाबत चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्षेपांवर ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही असे दिसून आले आहे.

माणगाव तर्फे वरेडी नळपाणी योजनेचे काम सुरू असून कोणती कामे पूर्ण झाली याची माहिती घेवून देतो.

अनिल मेटकरी,
उप अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आम्ही पाणी साठवण टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मान्य केली होती. वरिष्ठ अभियंते यांनी त्या कामाचे पाहणी आणि चौकशी पूर्ण केली असून चौकशी अधिकारी यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत.

सुजित धनगर,
सहायक अभियंता लघु पाटबंधारे विभाग रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version