केजमध्ये पुरस्कार वितरण, कोल्हापुरात कवी संमेलनातून शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा
|केज |प्रतिनिधी |
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केज येथे क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. 3 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला, तर कोल्हापुरात शेतकरी कवी संमेलनातून शेतकऱ्यांच्या व्यथा कवितांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या. केज येथील मुक्ताई सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाळाराम पाटील होते. ध्वजारोहण शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते झाले, तर उद्घाटन भाई रामदास जराटे यांनी केले. यावेळी माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, भाई पोपटराव बोराडे, ॲड. नारायण गोळे पाटील, भाई बापूसाहेब सोळुंके, कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात भाई मोहन गुंड यांच्या गेल्या 22 वर्षांतील पक्षबांधणीच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत घाडगे व डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले, तर जनार्दन सोनवणे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
याच वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर येथे शेकापच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीने शेतकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. विविध कवींनी शेतकऱ्यांच्या वेदना, संघर्ष आणि आत्मसन्मान कवितांमधून मांडत राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले. या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल सांस्कृतिक आघाडी प्रमुख भाई संतराम पाटील यांनी सर्व कवी, रसिक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
वारकरी परंपरा हिंसेची शिकवण देत नाही
बाळाराम पाटील
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन उभी केली. मात्र, आज समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या नावाने मारामाऱ्या करा, झोडा अशी भाषा करणारा वारकरी असूच शकत नाही. वारकरी परंपरा ही समता, प्रेम आणि मानवतेची शिकवण देणारी आहे, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शेकापने सातत्याने संघर्ष केल्याचेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेची लूट :मानसी म्हात्रे
शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणावर टीका करत, स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य वीज ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी जनतेला बसणार असून, सरकार जनतेऐवजी कंपन्यांचे हित जपत आहे, असा आरोप केला.
पुरस्काराने सन्मानित मान्यवर
कॉ. राजू देसले, संपादक गंमत भंडारी, ह.भ.प. अविनाश भारती, भाई संपत पवार, प्रा. डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, शाहीर तुकाराम ठोंबरे, स्वरूपा सुंदर नाईकवाडे, अनिता कांबळे आणि कॉ. बळवंत कदम यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महिला आघाडीची धुरा शिवकन्या गुंड यांच्याकडे
शेकाप महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी शिवकन्या मोहन गुंड यांची नियुक्ती करण्यात आली. महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भाई मोहन गुंड यांच्या पक्षबांधणीतील योगदानाचाही कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.
